Tuesday, March 25, 2008

........अश्रुंची कहाणी.....................


एकदा डोळ्यांतल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यांतुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............

दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,

उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........

ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी............
..........................Suvarna B

नको नेउस रे ती स्वप्नं....


नको नेउस रे ती स्वप्नं....
खुप त्रास होतोय मला,

अरे,
स्वप्नात मी बघते तुला,
तू माझ्या जवळ असतोस,
पण जागी होताच मी........
दूर दूर निघून जातोस,

त्या दूर गेलेल्या वाटेवर........
पाऊलखुणा शोधते मी,
पण ना तू असतोस,
ना पाऊलखुणा तुझ्या,

मागे उरतात......
फक्त आठवणी
अन्..................
त्या जखमा....
हो जखमाच त्या .........
मनावरच्या....
कधीच ब-या न होणा-या ....
हो....
घायाळ करतात तीच स्वप्नं मला,
डोळयांतल्या पाण्यावर ही आपला हक्क सांगतात.......
कारण, ती स्वप्नंच तुझी असतात....
पण तरीही मला हवी असतात....

छे रे.......
त्या जखमांना पालवी फुटण्यासाठी नव्हे....
त्यातच दडल्यात न आपल्या गोड आठवणी......
हं.....त्या वेचायच्या असतात मला......

म्हणुनच रे.......
नको नेउस ती स्वप्नं
खुप त्रास होतोय मला,

ए तुला एक सांगू का ?????
तुला जायचंय तर जा ना ......
पण; माझ्या डोळ्यांतली ती स्वप्नं राहू देत...
त्या अश्रुंबरोबर आता ती नेऊ नकोस.........
जगेन मी स्वप्नांच्या दुनियेत......
.कळतंय रे.....
तुला नाही आवडत ना....
स्वप्नात जगलेलं..........
म्हणुनच अस्तित्वाचं भान ठेउन जगेन .........
फक्त तुझ्यासाठी ...........
पण आता मला अड़वू नकोस ........
निदान स्वप्नात तरी रड़वू नकोस....
..........................सुवर्णा बडवे.

जगायचंय आता मला तुझ्याशिवाय..........


जगायचंय आता मला तुझ्याशिवाय;
हो, अगदी तुझ्याशिवाय..........
आधी प्रत्येक श्वासागणिक तुझी आठवण असायची,
तू बोललेली प्रत्येक गोष्ट मनात घर करून बसायची,
पण आता.........
त्या मनाची सगळी कवाडे बंद करून घेतलीत मी;
कारण....
जगायचंय आता मला तुझ्याशिवाय
हो, अगदी तुझ्याशिवाय..........
आधी तुझे बोलणं मला हवंहवंसं वाटायचं,
तुझ्याशी बोलणं झालं नाही की डोळ्यांत आभाळ दाटायचं,
पण आता........
चातकासारखी वाट पहाणंच सोडून दिलंय मी;
कारण ..........
जगायचंय आता मला तुझ्याशिवाय
हो, अगदी तुझ्याशिवाय..........
आधी तुझं +ve बोलणं मला नव्यानं जगवत होतं,
-ve विचार करायला गेले की माझं मन मला रागावत होतं,
पण आता.........
मन रागावलं तरी दुर्लक्ष्यच करते मी;
कारण ......
जगायचंय आता मला तुझ्याशिवाय
हो, अगदी तुझ्याशिवाय..........

.......................सुवर्णा बडवे.

"ती" आणि अश्रु - एक काव्य कथा


एकदा दोन अश्रु एकमेकांच्या प्रेमात पडले,
स्वप्नील तरंगात आकंठ बुडाले,ना कशाचे भान;
विसरले भूक - तहान;
आयुष्य भराच्या संगतीची,
घेतली त्यांनी आण;
आनंदाचे गाणे गात;
दोघे संगतीने राहत........

एक दिवस अचानक ........
काळlचे बांध फुटले,दु:खाचे महापूर लोटले;
आणि दु:खाच्या या सागरात;
एका अश्रुने कायमचे डोळे मिटले...........
दुस-याला जगणे नको झाले,
एक अश्रु गळुन पडला,
तुटून मात्र सखा गेला,
आक्रंदुन वेडा-पिसा झाला,
काय करावे सुचेना,
जीव द्यावासा वाटला जरी,
बाहेर पड़ता येईना,
पापण्याआड़ उभा राहून तो(अश्रु),
आता पुन्हा महापुराची वाट पाहू लागला............

एकदा मात्र .........
पापणी आड़ दडून त्या(अश्रु)ने पाहिले,
दूरवर असाच महापुर आला होता दु:खाचा ,काळोखाचा;
तेव्हा कळाले..........
आपला महापुर किती जीवघेणा होता,
मैफिलीतही "ती"ला एकटं करणारा होता,
त्या(अश्रु)ने आता ठरवलं....
नाही ..... आता जायचे नाही,
जिने आपल्याला डोळयात स्थान दिले,
"ती"ला एकटं सोडायचं नाही,
आपली संपलेली अधुरी कहाणी विसरायची,
"ती"ला जगायला मदत करायची,

तेव्हा पासून मित्रानो,............
आता"ती" रडत नाही,
कारण..
तो (अश्रु) "ती"ला सोडून कधीच जात नाही,
कितीही वादळं आली तरी,
फक्त पापण्याआड़ दडून पाहतो,
मनातल्या मनातच तो वाहतो,
आपल्या सखीला अजुन तो विसरला नाहीये,
पण आता त्या(अश्रु)ला
"ती"ला सोडायचं नाहीये,
स्वत:च्या सुखासाठी "ती"चं मन मोडायचं नाहीये......................
.....................................Suvarna B.

जगही तुझेच असेल..........


तू काय होतास हे बघत बसु नकोस,
दु:ख आले म्हणुन रडत बसु नकोस,
लढत रहा तुझ्या अस्तित्वासाठी,
झटत रहा तुझ्या कर्तुत्वासाठी,
वादळाला ही अंत असेल,
ते ही कधी निवांत बसेल,
तगण्याचा, तरण्याचा प्रयत्न कर,
मग बघ,
हे सारे जगही तुझेच असेल.......
....................Suvarna B.

Monday, March 24, 2008

बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!!


बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!!

माझ्या गालावरची खळी तुझ्या ओठाआड़ दडताना
तुझ्याच प्रेमाच्या मोहात माझे प्रेम पडताना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!

माझा गेलेला तोल तू हलुवारपणे सावरताना
मनातला गोंधळ हलक्या स्पर्शाने आवरताना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!

तुझ्या बाहुपाशांत मी सुख-स्वप्नं रंगवताना
मावळत्या सुर्यालाही आशेचे किरण पांगवताना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!

दुरवर उभा राहून तू माझ्याकडे पाहून हसताना
मृगजळ असुनही सारं काही सत्यात भासताना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!

पोटातलं दुःख लपवुन ओठात हसू ठेवून वागताना
तरीही माझ्या सुखासाठी देवाकडे मागणं मागताना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!

पावसाच्या सरींच्या प्रेमात पडलेल्या चातका सारखं आनंदात न्हाताना
माझे दुखा:श्रुही तुझ्या आनंदात गातांना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!

माझी सारी स्वप्नं तुझ्याबरोबर पूर्ण झालेली पहातांना
सारी सुखं आपल्या समोर हात जोडून उभी राहतांना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!
....................................Suvarna B.